अहमदाबाद- दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रच्या काही भागात येत्या चार दिवसांत हलका ते मध्यम पाऊस व गडगडाट पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावर “क्यार’ चक्रीवादळ घोंघावत आहे. अतिशय तीव्र “क्यार’ चक्रीवादळ ताशी 14 किमी वेगाने पूर्व-मध्य अरबी समुद्रावर पश्चिम – उत्तर-पश्चिम दिशेने सरकते आहे, असे हवामान विभागाने शनिवारी सांगितले.
येत्या 24 तासांत रविवारी दुपारपर्यंत दक्षिण गुजरातच्या समुद्र किनाऱ्यासह आणि समुद्रकिनारी समुद्र खवळलेला आणि अत्यंत खवळलेला राहिल असे हवामान खात्याने म्हटले आहे. सध्याच्या समुद्राच्या स्थितीमुळे मच्छीमारांना दक्षिण गुजरात किनाऱ्यावर जाऊ नये असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.
चक्रीवादळाच्या परिणामामुळे मंगळवार पर्यंत दक्षिण गुजरात जिल्ह्यातील डांग, तापी, सूरत, भरुच, वलसाड आणि नवसारी आणि सौराष्ट्रमधील अमरेली, गिर सोमनाथ, भावनगर व जुनागड आणि केंद्र शासित प्रदेश दमण व दीव येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले.