बिजिंग – चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढत असून त्यामुळेच येत्या सप्टेंबरमध्ये येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती आशिया ऑलिम्पिक समितीने दिली आहे.
या स्पर्धा येत्या 10 ते 25 सप्टेंबर या कालावधीत झेजियांग शहरात होणार होत्या. स्पर्धेचे यंदाचे 19 वे वर्ष होते. या स्पर्धेत 11 हजारांपेक्षाही जास्त खेळाडू सहभागी होणार होते. गेल्या आठवड्यापर्यंतआयोजक आणि आशिया ऑलिम्पिक परिषदेकडून सप्टेंबरमध्ये ठरल्याप्रमाणे स्पर्धा होतील, असे सांगण्यात येत होते. या स्पर्धा जरी पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरीही त्याचे नवे वेळापत्रक अद्याप तयार करण्यात आलेले नाही