पुणे – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा निकाल दिला.
दिलीप रामचंद्र गुरधाळकर (वय 35, रा. मुंढवा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
या प्रकरणी पीडितेच्या आईने मुंढवा पोलिसांत फिर्याद दिली होती. ही घटना 5 मे 2017 रोजी मुंढवा परिसरात घडली. गुरधाळकर याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील जावेद खान यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली.