न्यूयॉर्क : एलॉन मस्कने विकत घेतल्यापासून ट्विटरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. ट्विटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते लोगोपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर व्हेरिफिकेशनसाठी म्हणजेच ब्ल्यू टिकसाठी देखील यूजर्सना पैसे द्यावे लागत आहेत. ट्विटरचे कित्येक फीचर्स केवळ ब्लू टिक असणाऱ्या यूजर्सपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहेत. आता यामध्येच आणखी एका गोष्टीची भर पडली आहे.
ट्विटरच्या फ्री यूजर्सना आता या प्लॅटफॉर्मवरील पोल्समध्ये सहभागी होता येणार नाही. बॉट्सच्या वापराने पोल्सचे रिझल्ट बदलू नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्कने यांनी म्हटले आहे. ट्विटरवर एखादा प्रश्न विचारून, त्यावर होय-नाही किंवा बहुपर्याय देऊन लोकांची मतं घेतली जातात. या पोल्सचा वापर कित्येक वेळा रिसर्चसाठी देखील होतो. मात्र, कित्येक वेळा बॉट्सचा वापर करून याचे परिणाम बदलले जातात. हेच टाळण्यासाठी आता मस्कने नवीन नियम लागू केला आहे.
यानंतर आता केवळ व्हेरिफाईड यूजर्स एखाद्या पोलमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. यामुळे अधिक योग्य परिणाम मिळणार आहेत. मोठे उद्योगपती ब्रायन कॅसेन्स्टीन यांनी याबाबत पोस्ट केली होती. पोलमध्ये केवळ व्हेरिफाईड यूजर्सना सहभागी होता यायला हवं, असं त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले होते. तर, इलॉन मस्कने यावर रिप्लाय देत, हा अपडेट लवकरच येणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, ट्विटर युझर्ससाठी लवकरच ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर लॉन्च करण्यात येणार असल्याचे एलॉन मस्कने याआधी सांगितले आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर न घेताही, ट्विटरवरुन त्या व्यक्तीला कॉल करता येणार आहे. अँड्रॉईड, अॅपल, मॅक आणि विंडोज अशा सर्व प्लॅटफॉर्मवर हे फीचर उपलब्ध होणार आहे.