प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 – पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना भाविकांनी श्रींच्या मूर्ती नदीत विसर्जन करू नयेत, यासाठी महापालिकेने 22 ठिकाणी पक्के हौद तयार केलेले आहेत. त्यामुळे नदीकाठचे नागरिक या हौदांमध्ये विसर्जनास प्राधान्य देतात. मात्र, यंदा पालिकेने हे हौद बंद ठेवले होते. याबाबत टीका झाल्यानंतर हौदांची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. पाच दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन नागरिकांना या ठिकाणी करता येणार आहे. दरम्यान, दैनिक “प्रभात’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.
पालिकेकडून यंदा नदीपात्रात केले जाणारे विसर्जन 100 टक्के रोखण्याची तयारी करण्यात आली असून या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी या ठिकाणी लोखंडी टाक्या विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला बांधीव हौदात मात्र राडारोडा आणि माती तशीच ठेवत ते बंदच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना या गैरसोयीचा सामना करवा लागला. या प्रकारानंतर अखेर पालिका प्रशासन जागे झाले आहे. नदीपात्रातील हे हौद स्वच्छ करून पाचव्या दिवसाच्या विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.