काबूल – अमेरिकेच्या सैन्य माघारी संदर्भात अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांनी काल काबूलमध्ये तालिबानचा नेता अब्दुल घनी बरादर याची भेट घेतली, असल्याचे अमेरिकेच्या सूत्रांनी सांगितले.
बर्न्स हे बायडेन प्रशासनातील सर्वात अनुभवी मुत्सद्यांपैकी एक आहे. तर बरादर हा कतारमध्ये तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे कामकाज बघत होता. अमेरिकेच्या सैन्याच्या माघारीची अखेरच्या टप्प्यातील घाई सुरू असताना बर्न्स यांनी बरादर याची भेट घेऊन काय चर्चा केली हे मात्र समजू शकलेले नाही.
काबूलमध्ये सोमवारी ही भेट झाली, असे या भेटीशी संबंधित अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र सीआयएच्या प्रवक्त्यांनी मात्र या भेटीबाबत कोणतेही ठाम स्पष्टिकरण दिले नाही. कालच तालिबानने अमेरिकेला माघारीची मुदत पुढे ढकलल्यास त्याचा वाईट परिणाम होतील, अशी धमकीच दिली होती.
तर दुसरीकडे अमेरिकेच्या माघारी जात असलेल्या सैनिकांवर तालिबानने हल्ला केल्यास घातक परिणाम होतील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला होता. त्या पाश्वभूमीवर बर्न्स आणि बरोदर यांची चर्चा झाली असल्याची शक्यता व्यक्त होते आहे.