बीजिंग – चीनच्या सायनोव्हॅक कंपनीने तयार केलेली करोनाव्हॅक्स ही लस लहान मुलांसाठी सुरक्षित आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यात सक्षम असल्याचा दावा दी लॅन्सेट इन्फेक्शन डिसिजमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे.
सायनोव्हॅक्सच्या या लसीची 560 मुलांवर चाचणी घेण्यात आली होती. लसीचे दोन डोस दिले गेल्यानंतर यातील 96 टक्के मुलांमध्ये पर्याप्त करोनाविरोधी अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले असल्याचे संबंधित पत्रिकेत म्हटले आहे. लस देण्यात आलेल्यांना कोणताही गंभीर त्रास झालेला नाही. लस दिली ठिकाणी थोडे दुखण्यासारख्या किरकोळ तक्रारीच फक्त समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
चीनच्या सायनोव्हॅक्स लाइफ सायन्सेसचे छियांग गाओ म्हणाले की लहान मुले आणि किशोरांमध्ये प्रौढांच्या तुलनेत करोनाची अत्यंत सौम्य लक्षणे असतात तर काहींमध्ये अजिबात लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र काही मुलांमध्ये गंभीर लक्षणे असू शकतात. त्यामुळे मुलांना देण्यात येणाऱ्या लसीची चाचणी आणि अभ्यास आवश्यक ठरतो.
चीनच्या शानहुआंग काउंटीमध्ये तीन ते सतरा वयोगटातील मुले आणि किशोरांवर क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या काळात अगोदर 80 मुलांवर चाचणी करण्यात आली. त्यानंतर 12 डिसेंबर ते 30 डिसेंबर या काळात अन्य 480 जणांची चाचणी झाली. या मुलांना 28 दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
पहिल्या डोस नंतर शंभर टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या. तर दुसऱ्या डोसनंतर हे प्रमाण 97 टक्के होते. प्रौढांच्या तुलनेत मुले आणि किशोरांमध्ये प्रतिकार क्षमता अधिक विकसित झाली असल्याचे आढळून आले, संशोधकांचे म्हणणे आहे.