औरंगाबाद – एमआयएम पक्षाने उत्तर प्रदेशातील निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना एमआयएम पक्षाचे नेते व खासदार इम्तियाज जलील यांनी अबू आझमी यांनाच एमआयएम पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले आहे.
एमआयएम पक्षाने उत्तर प्रदेशात शंभर जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फाटाफूट होईल आणि त्याचा भाजपलाच लाभ होईल, अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी व्यक्त केली होती.
एमआयएम पक्षाने मुस्लीम नेत्यांचा सल्ला धुडकावून हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया नोंदवताना इम्तियाज जलिल यांनी म्हटले आहे की, अबू आझमी यांनीच मजिलसमध्ये दाखल व्हावे. आपण एकत्रितपणे समाजवादी पार्टी, भाजप व कॉंग्रेसच्या विरोधात लढू.