मुंबई – कधी नव्हे ते वृत्तपत्रांच्या पहिला पानावरील जाहिरातीमुळे राज्यातील राजकारण तापल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या या जाहिरातीवरून आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. तसेच तुम्ही इतकेच लोकप्रिय आहात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर करा, असे थेट आव्हानच त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले आहे.
पवार म्हणाले, इतकी वर्षे राजकारणात आहे पहिल्यांदा अशी जाहिरात बघितली. ही जाहिरात देऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे हसे करून घेतले आहे. शिवसेनेने स्वतःच ठरवून सर्वेक्षण केले. पण हे सर्वेक्षण कोणी केले? कोणी सांगितलं की कोणाला किती टक्के पसंती आहे? अशा प्रकारची सर्वेची जाहिरात करण्याचा एक विश्वविक्रमच राज्याच्या प्रमुखांनी केला आहे.
पवार सर्वेतील तथ्यांवर बोलताना पुढे म्हणाले, लोकांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा कौल दिला आहे हे ऐकून खूपच आनंद वाटला. कारण, चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांना शिंदे पुढे व्हावेत असे वाटायला लागले आहे. मग इतकाच जर तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे. तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाहीत? असा सवाल विचारत त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना आव्हानच दिले आहे.
निवडणुकांची भीती आहे
येत्या पंधरा-वीस दिवसांत निवडणुका घेतलेल्या नाहीत याला एक वर्षे होईल. वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते विविध पदांसाठी इच्छुक आहेत, तरी सुद्धा तुम्ही निवडणुका घेत नाहीत. उन्हाळा सुरू असतानाही तुम्ही निवडणूक घेतली नाही.
पण आत्ता निवडणुका जाहीर करून पावसाळा संपला संपला की तुम्ही निवडणूक घेऊ शकता, पण त्यांना निवडणुका घेण्याची भीती वाटते. एकीकडे जाहिरातीत मात्र एवढ्या प्रमाणावर खर्च करायचा, याला अर्थ नाही, अशीही टीका अजित पवारांनी यावेळी केली.