पुणे, दि. 13 -पुणे महापालिकेच्या क्लार्क परीक्षेत मोबाईल, ब्लूट्यूथद्वारे कॉपी करणाऱ्या उमेदवाराला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. शिवणे परिसरातील प्रेस्टीज पब्लिक स्कूल येथे हा प्रकार घडला. पवन उत्तम मारक (रा. औरंगाबाद) असे अटक आरोपीचे नाव आहेत. त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या क्लार्क कम टायपिस्टची बुधवारी (दि. 12) परीक्षा होती. मारक सकाळी परीक्षा केंद्रामध्ये गेला. यावेळी तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याने जवळ कोणतीही वस्तू नसल्याचे सांगितले होते. मात्र, परीक्षा सुरू झाल्यावर त्याने मोबाइल डिव्हाईस काढले. मोबाईल, ब्ल्यूट्युथद्वारे माहिती करुन घेत असताना त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी मारक याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शबनम शेख करीत आहेत.
अशी केली कॉपी
परीक्षार्थी परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर संगणकावर परीक्षा देत होता. परीक्षार्थीकडून मोबाईलवर प्रश्नाचे फोटो काढून केंद्राच्या परिसरात असलेल्या सहकारी मित्राच्या मोबाईलवर पाठवत होता. त्याचे उत्तर शोधून मित्र परीक्षार्थीला पाठवित होता. दरम्यान, परिसरातील कर्मचाऱ्यांना संबंधित तरुणाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्याला विचारण केली असता आणि मोबाईल तपासणी केल्यावर हा प्रकार समोर आला.