लोकसभेसाठी होतोय आग्रह
2014 ला दिली होती तुल्यबळ लढत
केडगाव – सन 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने “मिशन बारामती’ची घोषणा केली असुन त्या दृष्टीने तयारीही सुरू केली असली तरी भाजपाच्या मिशन बारामतीला राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नुकताच इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर देवाच्या यात्रेत राष्ट्रीय समाज पक्षाने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात रासपाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी बारामती लोकसभा मतदार संघात लोकसभेला जानकर हे उचित पर्याय ठरू शकतात असे वक्तव्य करून भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. देश पातळीवर रासप भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष असला तरी मागील काही दिवसांपासून जानकर यांनी भारतीय जनता पक्षापासून सावध पवित्रा घेत दूर राहणे पसंत केले आहे.
2019 साली दौंड तालुक्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे तत्कालीन आमदार आणि सध्या भारतीय जनता पक्षात गेलेले राहुल कुल यांच्यासाठी दौंडची जागा भारतीय जनता पक्षाने सोडली होती; परंतु जानकर यांना अंधारात ठेवून ऐनवेळी राहुल कुल यांच्या उमेदवारी अर्जाला भाजपाचा ए बी फॉर्म जोडून भाजपने धोका दिल्याची सल अनेक कार्यक्रमातून जानकर यांनी बोलून दाखवली आहे. शिवाय 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना जानकर यांनी कडवी झुंज दिली होती. केवळ 69 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांनाही अशी लढत देता आली नाही. या निवडणुकीत भाजपाचे मतदान वाढले असले तरी 2014 च्या तुलनेत जास्त मतांनी कुल यांना पराभव स्वीकारावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. बारामती मतदार संघात धनगर समाजाची मोठी मतदार संख्या आहे. महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत.
एकंदरीत रासपने महादेव जानकर यांची बारामती लोकसभा मतदार संघासाठी घोषणा करून बॉंब टाकला आहे. यामुळे भाजपसमोरील अडचणी वाढल्या असून पक्षाच्या मिशन बारामतीला जानकरांचा अडथळा निर्माण होतो की काय? असे चित्र निर्माण झाले आहे.
2024 ला तिरंगी लढत शक्य
2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने बारामती मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे दौरे मतदार संघात घेत वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु काल इंदापूर तालुक्यातील रुई या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात महादेव जानकर हे बारामती लोकसभेत राष्ट्रीय समाज पक्षाकडून पर्यायी उमेदवार ठरू शकतात असे शेवते म्हणाले आणि आगामी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष अशी तिरंगी होईल आणि निवडणुकीत याचा फायदा अर्थातच भाजपा आणि रासपा यांच्यातील मत विभागणी होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला होणार असे राजकीय जाणकार मत व्यक्त करताना दिसत आहेत.