नगर (सूर्यकांत वरकड/प्रतिनिधी) – करोना रुग्णांकडून खासगी हॉस्पिटलमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या रक्कमेपक्षा अधिक बिल घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी बिलाचे ऑडिट करण्यासाठी आता प्रत्येक हॉस्पिटलला शासकीय ऑडिटर नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अतिरिक्त बिलाचा प्रश्न सुटणार असून, बेडचा तपशीलही समजणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
करोनावर उपचार करण्यासाठी खासगी हॉस्पिटलला शासनाने मेडिकल साहित्याची दर निश्चित करून दिले आहेत. 2020 मध्ये करोना रुग्णांचे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त बिल वसूल करण्यात आले. त्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकार्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची पडताळणी करून रुग्णांचे जास्तीचे बिल हॉस्पिटलकडून वसूल करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.
दरम्यान, करोनाची दुसरी लाट जिल्ह्यात सक्रीय झाली. आज दररोज सुमारे दोन हजार रुग्ण आढळून येत आहेत. तर, सरारसरी 15 ते 20 जणांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यासह शहरामध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांची मोठी संख्या आहे. नगर शहरामध्ये 37 रुग्णालयांमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
करोना रुग्णांकडून शासनाने निश्चित केलेल्या नियमावलीपेक्षा जास्तीची बिले घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी तालुकास्तरावर व नगर शहरामध्ये प्रत्येक हॉस्पिटलला बिलाची पडताळणी करण्यासाठी शासकीय ऑडिटर नेमण्याचे आदेश दिले आहेत.
त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी कार्यवाही सुरू केली आहे. तर, तालुकास्तरावर सहकार, पंचायत समितीमधील लेखा परीक्षकांना रुग्णालयात ऑडिटर म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. बिलाचे ऑडिट आणि बेड स्थिती संबंधित ऑडिटरला पोर्टलवर ऑपलोड करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत याची माहिती समजणार आहे.
2020 मध्ये करोना काळात खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त बिले वसूल करण्यात आली. याबाबत 65 तक्रारी जिल्हाधिकार्यांकडे दाखल झाल्या होत्या. त्या बिलाची पडताळणी केली असता त्यात 17 हॉस्पिटलमधील एक हजार 22 रुग्णांकडून एक कोटी 22 लाख रुपयांचे अतिरिक्त बील वसूल केल्याचे स्पष्ट झाले. त्यातील काही हॉस्पिटलने खुलासे दिले आहेत. मात्र, उर्वरित रुग्णालयांकडून अतिरिक्त बिले वसूल करावेत, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
पल्लवी निर्मळ, उपजिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष
ऑडिटरची बदली होणे आवश्यक
प्रत्येक हॉस्पिटलला ऑडिटर नेमल्यास अतिरिक्त बिल घेणे थांबणार आहे. जिल्हाधिकार्यांचे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. मात्र, नेमलेल्या ऑडिटरची पंधरा दिवसांनी बिले होणे आवश्यक आहे. गैरप्रकाराला आणखी चाप बसेल, असे बोलले जात आहे.