वाहतुकीचे नियम मोडल्याने नागरिकांकडून आकारला दंड तर आमदारांना कारवाईविनाच सोडले
शिक्रापूर- पुणे-नगर महामार्गावर होणारी वाहतूक दिवसेंदिवस वाढत असून शिक्रापूरची वाहतूककोंडी ही महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे, तर ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले असून शिक्रापूर पोलिसांनी बेशिस्त व विरुद्ध दिशेने येणाऱ्या 78 वाहनचालकांवर कारवाई करीत एका दिवसांत तब्बल 55 हजार रुपये दंड वाहनचालकांना ठोठावला आहे. दरम्यान, या कारावाई दरम्यान नगरमधील एका नवनिर्वाचित आमदाराच्या वाहनचलाकानेही वाहतूकनियम मोडला होता; मात्र, शिक्रापूर पोलिसांनी त्यांना वाहतूकनियम मोडू नका एवढीच विनंती करून सोडून दिले, त्यामुळे आपला तो बाबू अन् दुसऱ्याचे ते कार्ट का? असा सवाल इतर वाहनचालकांनी यावेळी उपस्थित केला.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी नित्याचीत झाली असून दररोज वाहनांच्या सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत रांगा लागत असतात, त्यामुळे वाहतूककोंडी वाहनचालक, ग्रामास्थ प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. चाकण व पाबळ चौकात तर बेशिस्त वाहनचालक, बेशिस्त पार्किंग विरुद्ध दिशेने वाहतूक यामुळे जास्त प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे, अशा वाहनांवर व चालकांवर कारवाई करण्याचे सत्र शिक्रापूर पोलिसांनी नुकतेच हाती घेतले आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, किरण भालेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, पोलीस नाईक योगेश पाटील, राजेंद्र मदने, ज्ञानदेव गोरे, राजेंद्र घनवट, ट्राफिक वार्डन किरण थोरात, बाळकृष्ण शिंदे, सतीश गव्हाणे, नरेंद्र थोरात यांनी पोलिसांनी दिवसभर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत वाहतूककोंडी नियंत्रणात आणण्याचे काम केले. बेशिस्त वाहनांबरोबरच विनापरवाना, ट्रिपल सिट, बिगर नंबर, विरुद्ध दिशेने येणारी वाहने या वाहनांवर देखील कारवाई केली.
शिक्रापूर पोलिसांनी हाती घेतलेल्या या कारवाईचा वाहनचालकांनी देखील चांगलाच धसका घेतला असून परिसरातून या कारवाईचे स्वागत देखील ग्रामस्थ करीत आहेत. तर दररोज अशा पद्धतीच्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून वाहनचालकांना शिस्त लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
- सध्या सुरु असलेली कारवाई ही यापुढे देखील अशीच सुरु ठेवणार असून या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणार आहे.
– राजेश माळी, उपनिरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे