इस्लामाबाद – पाकिस्तानात ( Pakistan ) खैबर पख्तुन्वा प्रांतात एका स्कूल व्हॅनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात व्हॅनचा चालक ठार झाला आहे. तर काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी घडली होती. या हल्ल्यानंतर खैबर पख्तुन्वा प्रांतातील विविध जिल्ह्यांमध्ये तीव्र निदर्शने होऊ लागली आहेत.
स्वात खोऱ्यातील नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी या प्रांतातील मिनगोरा, हारिपूर आणि बट्टाग्राम बागांमध्ये मोठे मोर्चे काढण्यात आले. ठार झालेल्या चालकाच्या कुटुंबीयांनी तब्बल 40 तास आंदोलन करून नंतर चालकाच्या मृतदेहाचे दफन केले.
खैबर पख्तुन्वा प्रांतातील माजी लोकप्रतिनिधींनीही या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून शालेय विद्यार्थ्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. स्कूल व्हॅनवरील या हल्ल्यामुळे पेशावरमदील लष्करी शाळेवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्याचे या लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे.