सिमला – हिमाचल प्रदेशात चंबा जिल्ह्यात एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ जण ठार झाले तर अन्य नऊ जण जखमी झाले आहेत. अपघाताचे हे स्थळ चुऱ्हा तालुक्यात येते. आज सकाळी एक खासगी बस या मार्गावरून जात असताना ती थेट दरीत कोसळली.
या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याच्या कारणांच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी विधानसभेत दिली. सकाळी सव्वा दहाच्या सुमाराला हा अपघात झाला. बस सुमारे दोनशे मीटर आत दरीत कोसळली असल्याचे आढळून आले आहे. जखमींना चंबा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस मध्ये एकूण 18 प्रवासी होते. त्यातील नऊ जण जागीच ठार झाले असून तीन जण अत्यवस्थ आहेत.