पुणे : चिमुकलीला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या 55 वर्षीय नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश ए.यु. मालवणकर यांनी सुनावली. दंडापैकी पाच हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
सुरेश गोविंद झांबरे (वय 55) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पीडित 8 वर्षे 4 महिन्यांच्या चिमुकलीच्या आईने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. 16 मे 2016 रोजी ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलगी, प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली.
भोसरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिरीष रसाळ आणि पोलीस नाईक रविंद्र गभाळे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. पीडित खेळत असताना तिला अमिष दाखवून झांबरे याने घरात नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
त्यावर युक्तीवाद करताना आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. सुनील हांडे यांनी केली. आरोपीचा बनाव खोटा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर सुनावणी करत न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि बालालैंगिक अत्याचार कलम पाच नुसार ही शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त दोन वर्षे कारावास भोगावा लागणार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.