सातारा -लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नितीन अर्जुन जाधव (रा. मोही, ता. माण, सध्या रा. अंदोरी, ता. खंडाळा) याला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी दहा वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अधिक माहिती अशी, नितीन जाधव हा खंडाळा तालुक्यातील एका गावातील चौदा वर्षे वयाच्या पीडितेच्या मामाच्या घराच्या बांधकामासाठी गेला होता. त्यातून दोघांची ओळख झाल्यावर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. याबाबत पीडितेच्या नातेवाइकांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. के. कुटे, जी. व्ही. पवार यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश पटणी यांच्यासमोर झाली. त्यात सहाय्यक जिल्हा सरकारी वकील नितीन मुके यांनी केलेला युक्तिवाद व दहा साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार अडसूळ यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हवालदार शमसुद्दीन शेख, एम. के. मणेर, जी. एच. फरांदे, अमित भरते, राजेंद्र कुंभार, रिहाना शेख, अश्विनी घोरपडे यांनी सहकार्य केले.