इस्रायलच्या गाझापट्टीवरील हल्ल्यात दहा जण ठार; संघर्षावर अद्याप तोडगा नाही

गाझापट्टी – इस्रायलने आज गाझापट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यात दहा जण ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये बहुतांशी लहान मुलेच अधिक आहेत. अलीकडच्या काळात इस्रायलने केलेला हा सर्वात भीषण हल्ला होता. गेल्या आठवड्यापासून पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तणावपूर्ण झाला आहे. त्यातून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात आहे.

दोन्ही बाजूंमध्ये सुरुवातीच्या काळात जेरूसलेममध्ये चकमकी झडत होत्या. त्याला आता अधिक व्यापक स्वरूप आले आहे. हमासकडून इस्रायली हद्दीत मोठ्या प्रमाणात रॉकेट्‌स डागली जात आहेत पण ही रॉकेट्‌स इस्रायलच्या क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीद्वारे हवेतच नष्ट केली जात असल्याने इस्रायली हद्दीत मोठी जीवितहानी झालेली नसली तरी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत गाझापट्टीत 137 जण ठार झाले आहेत. त्यात 31 मुले आणि 20 महिलांचा समावेश आहे.

तथापि, त्यात समझोैता करण्यासाठी आता अमेरिका आणि संयुक्‍त राष्ट्रांनी पुढाकार घेतला आहे. या संघर्ष विरामावर चर्चा करण्यासाठी संयुक्‍त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची रविवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

इस्रायली लष्कराचे प्रवक्‍ते लेफ्टनंट कर्नल जोनॉथन कॉनरीकस यांनी सांगितले की, आम्ही गनिमांच्या दिशेने गाझात हल्ले करीत आहोत. त्यात सामान्य नागरिकांचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत आहोत. पण या हल्ल्यांपूर्वी नागरिकांना सावध करणारे इशारे जारी करणे या क्षणी शक्‍य नाही. गाझापट्टीत गजबजलेली लोकवस्ती आहे. तेथे लोकांना वीज आणि पाण्याचीही मोठी टंचाई जाणवते आहे. तेथे सुमारे वीस लाखांची वस्ती आहे असे सांगण्यात येते.

खुद्द इस्रायलमध्ये अरबांची मोठी वस्ती आहे. तेथेही स्थानिक नागरिकांमध्ये अरब आणि ज्यु यांच्यातही संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांवर हल्ले करीत असून एकमेकांची घरे ते उद्‌ध्वस्त करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.