जालना, दि. 15 – कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांना सायटोमॅगीलो हा नवीन विषाणूचा संसर्ग झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात असून उद्या आपण जहांगीर रुग्णालयात भेट देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सातव सध्या व्हेंटिलेटवर असून ते काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाले होते. राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचे डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होते.
सातव यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहिला. त्यामुळे त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेतेही जहांगीर हॉस्पिटलमध्ये येऊन सातव यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेत आहेत.
19 एप्रिलला राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र, 25 तारखेला त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. परंतु 19 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवान निगेटिव्ह आला होता.