खालापूर – नितीन देसाई आत्महत्या गुन्ह्याच्या अनुषंगाने एडलवाईज फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फणीद्रनाथ काकरला आणि तीन पदाधिकाऱ्यांची खालापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.11) सुमारे दहा तास चौकशी करण्यात आली. शुक्रवारी सकाळी साडे दहा ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत पोलीसांकडून चौकशी करण्यात आली. तपासा दरम्यान निष्पन्न झालेल्या मुद्यांच्या अनुषंगाने अधिक माहिती आणि कागदपत्रांसह सोमवारी (दि.14) सकाळी साडे दहा वाजता हजर राहण्याची कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत देसाई यांच्या पत्नी नैना देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. पोलीस ठाणे तक्रार दाखल केल्यानंतर याबाबत या कंपन्यांकडून विविध मुद्यांवर माहिती रायगड पोलिसांनी मागविण्यात आली होती.
त्यानुसार मंगळवारी 8 ऑगस्ट रोजी कंपनीचे व्यवस्थापक संचालक फणीद्रनाथ काकरला आणि इतर तीन पदाधिकारी खालापूर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडे सहा पर्यंत अशी नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी 11 ऑगस्ट उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल रात्री 9.30 वाजेपर्यंत चौकशी केली