पुणे – टेमघर धरण दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम संपल्यानंतर मजबुतीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. टेमघर धरण हे भूकंप झोननुसार झोन-3 मध्ये येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने टेमघर धरणासाठी नेमलेल्या समितीने धरणाचे काम भूकंपरोधक करण्यासाठी त्यासाठीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (सीडब्लूपीआरएस) या संस्थेला दिल्या आहेत.
धरणाची दुरुस्ती सद्यस्थिती आढावा बैठक नुकतीच टेमघर येथे झाली. यातध्ये या सूचना देण्यात आल्या आहेत. टेमघर धरणाचे काम 1197 मध्ये सुरू करण्यात आले. त्यावेळी धरण सुरक्षिततेच्या 1984 च्या निकषानुसार काम करण्यात आले. आता मात्र 2015 मध्ये धरण सुरक्षेचे नवे निकष जारी करण्यात आले. त्यानुसार धरणाच्या मजबुतीकरण आवश्यक आहे. धरणाचा परिसर भूकंप क्षेत्राच्या झोन 3 मध्ये येतो. त्यामुळे धरणाची गळती रोखण्याबरोबरच धरण भूकंपरोधक असणेही आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर समितीने धरणाच्या मजबुतीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
धरणाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून धरणात पाणीसाठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, यानंतर अवघ्या दोन ते तीन वर्षांतच धरणातून गळती होत आहे. 2016मध्ये धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आली. पाणी गळतीचे प्रमाण प्रति सेंकद 2 हजार 587 लिटर एवढे होते. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला होता.
गळतीमुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास शासनाने मान्यता दिली नव्हती. 2017 मध्ये धरण दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. धरण दुरुस्तीच्या कामांना यश आल्याने शासनाने 2019 मध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास परवानगी दिली. त्यानुसार टेमघर धरण 100 टक्के भरण्यात आले. टेमघर धरणाची क्षमता 3.71 टीएमसी इतकी आहे. यंदा धरण 100 टक्के भरल्याने शहराला यंदा एक टीएमसी जादा पाणी उपलब्ध झाले.
टेमघर धरण मागील महिन्यात रिकामे करण्यात आले असून दुरुस्तीसाठीचे ग्राऊंटिंग 90 टक्के, तर धरणाच्या आतील बाजूच्या भिंतीचे अस्तरीकरण करण्याचे काम 30 टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.