महापालिकेकडून सदनिकेची किंमत निश्चित
पंतप्रधान आवास योजना; 3 हजार 664 सदनिका; भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचे नवे धोरण
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली, रावेत, आणि बोऱ्हाडेवाडी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील 3 हजार 664 सदनिका (फ्लॅट) साठी लाभार्थी, त्यांचा हिस्सा आणि सोडत प्रक्रिया निश्चित करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत चऱ्होलीतील सदनिकेची किंमत 9 लाख 19 हजार, रावेत येथील सदनिका 9 लाख 45 हजार आणि बोऱ्हाडेवाडीतील सदनिकेची किंमत 8 लाख 71 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत ठिकठिकाणी आरक्षित जागांवर “सर्वांसाठी घरे -2022′ या योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. आता पालिकेने भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचे धोरण स्वीकारले असून चऱ्होली (1442), रावेत (934), बोऱ्हाडेवाडी (1288), आकुर्डी (568), आणि पिंपरी – वाघेरे (370) या ठिकाणी 30 चौरस मीटर (323 चौरस फुट) चटई क्षेत्रापर्यंतची घरकुले बांधण्याचे नियोजन आहे. या अंतर्गत केंद्र सरकारकडून दीड लाख आणि राज्य सरकारकडून एक लाख रुपये प्रति घरकुल अनुदान मिळणार आहे. या पाचही गृहप्रकल्पांचे काम सध्या वेगाने सुरु आहे.
सद्यस्थितीत चऱ्होली, रावेत, आणि बोऱ्हाडेवाडी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा प्रकल्प सुरू आहे. महापालिका मंजूर विकास आराखड्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्युएस) आणि बेघरांसाठी घरे (एचडीएच) या योजनांसाठींची आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी 2.5 चटई निर्देंशांक वापरून प्रकल्पास सरकारची मान्यता घेतल्यानंतर बांधकाम परवानगी नियमानुसार पर्यावरण विभागाच्या परवानगी प्राप्तीनंतर प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानुसार, सद्यस्थितीत या प्रकल्पामध्ये 14 ते 15 मजली इमारतीमध्ये 30 चौरस मीटर चटई क्षेत्राच्या सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. ही योजना खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे या घटकांचा अवलंब करून राबविण्यात येत आहे.
नव्या नियमांमुळे गरजू अर्ज करतील- आयुक्त
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी आणि रावेत या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्लब घटकांसाठी गृहप्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यातील तीन हजार 664 सदनिकांसाठी नव्याने ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. अर्जासमवेत पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जोडणे बंधनकारक केले असल्यामुळे घर घेण्याची खरी गरज असणारेच अर्ज करतील, असे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.
अर्ज भरताना लागणार पाच हजारांचा डीडी
पंतप्रधान आवास योजनेतील घरासाठी इच्छुक लाभार्थ्याने मुदतीत महापालिकेने दिलेल्या लिंकद्वारे अर्ज भरून तो ऑनलाईन सादर करायचा आहे. नव्याने अर्ज भरणाऱ्या लाभार्थ्यांनी यापूर्वीच्या सर्व्हेक्षणात भाग घेतला नसल्यास त्यांनी स्वत:चा अर्ज व कागदपत्रे तपासणीसाठी महापालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणी पात्रता पडताळणी करून घेणे आवश्यक राहील. त्याच ठिकाणी अर्ज, कागदपत्रे आणि पाच हजार रूपये डिमांड ड्राफ्ट जमा केल्यानंतर पोहच पावती देण्यात येईल. यापूर्वी अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांनी यापूर्वीच्या सर्व्हेक्षणात भाग घेतला असल्यास त्यांनाही पाच हजार रूपयांचा डीडी द्यावा लागणार आहे. या प्रक्रियेचा कालावधी 30 दिवसांचा राहणार आहे.
तीन टप्प्यात भरावी लागणार रक्कम
प्रति सदनिकेसाठी केंद्र सरकार दीड लाख रूपये, राज्य सरकार एक लाख रूपये अनुदान देणार आहे. तसेच उर्वरित रक्कम लाभार्थी हिस्सा राहणार असून तो तीन टप्प्यात लाभार्थ्यांकडून घेण्यात येणार आहे. त्यानुसार, घरकुलांची सोडत झाल्यानंतर अर्जदारास 40 टक्के रक्कम भरावी लागेल. गृहप्रकल्पाचे काम 50 टक्के झाल्यावर अर्जदारास सदनिकेची उर्वरित 40 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तर, गृहप्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर उर्वरित वीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे. हिश्श्याचे टप्पे रेरा नियमानुसार ठेवण्यात आलेले आहेत.