सातारा, (प्रतिनिधी) – समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. शिक्षणामुळेच युवा पिढी स्वतःच्या पायावर उभी राहते. त्यामुळे ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षक हे सर्वांसाठीच आदर्श आहेत. शिक्षक हेच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत पिढी आणि समाजनिर्मितीचे जनक आहेत, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील अजिंक्यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिराचे प्राचार्य शिवाजी मोरे व शाळेचे सेवक दत्तात्रय मोहिते या दोघांचा सेवानिवृत्ती सत्कार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष यशवत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, सेक्रेटरी जिवाजी मोहिते, सदस्य रामभाऊ जगदाळे, सर्जेराव सावंत, जयवंत कुंभार, कारखान्याचे सर्व संचालक, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्राचार्य मोरे व मोहिते यांच्या कार्याचे कौतुक केले. शाळेच्या, संस्थेच्या व विद्यार्थी हितासाठी राबवलेल्या वेगवेगळ्या योजनांचे, शाळेची शिस्त, एसएससी, एचएससी, एन एम एम एस, शिष्यवृत्ती, मंथन, शासकीय रेखा कला परीक्षा, क्रीडा स्पधोमध्ये गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नाबद्दल सर्वांचे कौतुक केले.
पांडुरंग कणसे यांनी प्रास्ताविक केले. सन्मानपत्राचे वाचन कलाशिक्षक विवेक जाधव व शिक्षिका सौ. सुदर्शना जगताप यांनी केले. प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक शंकर पवार, संतोष मोरे, माजी विद्यार्थी डॉ. रणजीत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य मोरे यांनी त्यांच्या सेवापूर्व व सेवाकाळातील संघर्षपूर्ण प्रसंगांचे वर्णन केले. दत्तात्रय मोहिते यांनी आपल्या सेवापूर्व व सेवेतील काळात केलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा उलगडा केला.
नेताजी ननावरे व सतीश यादव यांनी सूत्रसंचालन केले. महेश जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास सौ. वैशाली मोहिते, धनाजी जाधव, श्रीमती जयश्री रानभरे, शितल साळुंखे, संभाजी मगर, सौ. धनश्री शिदे, वैशाली पवार, विनोद कोळेकर, सौ. वंदना बर्गे, अविनाश घाडगे, किरण बल्लाळ, रचना वानखेडे, सौ. सुरेखा कुंभार, सौ. वर्षा क्षीरसागर, सौ. तेजस्विनी पोतेकर, शंकर वाघमारे, बंडू मोरे, राजेंद्र गुरव यांच्यासह शिक्षक, विध्यार्थी, मित्रपरिवार उपस्थित होता.