दौंड (पुणे) – केडगाव (ता. दौंड) येथील पदवीधर मतदान केंद्रास भेटीप्रसंगी आमदार राहुल कुल व गणेश थोरात यांनी एकत्र घेतलेल्या चहाच्या चर्चेला तालुक्यात चांगलाच रंग चढला आहे. त्यामुळे आमदार कुलांच्या गोड ऑफरमुळे पुढच्या पिढीतला गोडवा वाढणार का? असा तर्कवितर्क केडगाव परिसरात लावला जात आहे.
स्व. आमदार सुभाष कुल यांच्यानंतर दौंडचे आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांचे विळ्या भोपळ्याचे वैर जिल्ह्यासह महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र आमदार राहुल कुल व गणेश थोरात यांचा नव्या पिढीतील होणार हा संवाद वैर कमी करणारा ठरू शकेल का? तसेच कुल व थोरातांच्या दुसऱ्या राजकीय पिढीतील गोडवा वाढेल का अशी चर्चा सुरू झाली आहे.
पदवीधर व शिक्षक विधानपरिषदेचे मतदान झाले आहे. हे मतदान सुरू असताना नेते मंडळी मतदान केंद्रास भेटी देत असतात. अश्यातच आमदार राहुल कुल हे केडगाव येथील मतदान केंद्रास भेट देत असताना माजी आमदार व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे चिरंजीव गणेश थोरात हे ही त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी आमदार कुल यांनी समोर उभा असलेले गणेश थोरात यांना आवाज देत चहा घेऊ असे म्हणताच, थोरात यांनीही क्षणाचा विलंब न करता लगेच चहा प्यायला गेले. यामुळे त्या ठिकाणी उपस्थित कुल-थोरात समर्थकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. याप्रसंगी आमदार राहुल कुल यांनी गणेश थोरात यांच्याशी अनेक विषयांवर चाय पे चर्चा देखील केली.