पिंपरी – करदात्यांचे विविध प्रश्न, त्यांना करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी जनसंवाद सभेच्या धर्तीवर करसंवादचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कर आकरणी व करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिन्यातील चौथ्या शनिवारी सकाळी 11 वाजता हा करसंवाद ऑनलाइन पध्दतीने होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 77 हजार मिळकतींची नोंदणी आहे. या सर्व मिळकतींना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत कर गोळा केला जातो. मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधांसह 16 विभागीय कार्यालयात कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. करदात्यांना घर बसल्या जास्तीत-जास्त सेवा-सुविधा कशाप्रकारे उपलब्ध होतील, यासाठी कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त देशमुख यांचा विशेष प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने आता करसंवाद हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
करदात्यांचे विविध प्रश्न, त्यांना करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंका, कर कशाप्रकारे लावला, चुकीची कर आकारणी केली आहे, असे विविध प्रश्नांची सोडवणूक या करसंवादच्या माध्यमातून सोडविण्याचा कर संकलन विभागाचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक महिन्यातील चौथ्या शनिवारी सकाळी 11 वाजता फेसबुक, युट्युब या माध्यमातून ऑनलाइन पध्दतीने हा करसंवाद होणार आहे. यावेळी करदात्यांना आपले प्रश्न विचारता येतील. या प्रश्नांची कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त देशमुख यांच्यासह सर्व मंडलाधिकारी, प्रशासन अधिकारी “ऑन दी स्पॉट” प्रश्न सोडविणार आहेत.
ऑफलाइन सुविधा उपलब्ध
ज्या नागरिकांना करसंवादला ऑनलाइन सहभागी होता येणार नाही, अशा नागरिकांचे कर आकारणी संदर्भात जे काही प्रश्न असतील त्यांनी महापालिकेच्या तळमजल्यावरील कर आकारणी व कर संकलन विभागाच्या कार्यालयात महिन्यातील चौथ्या शनिवारी सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे. यावेळी सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख, सर्व मंडलाधिकारी, प्रशासन अधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत नागरिकांना आपले प्रश्न घेऊन सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांना समक्ष भेटता येणार आहे.