मुंबई – कच्च्या मालाचे दर वाढले असल्यामुळे विविध क्षेत्रात दरवाढ चालू आहे. टाटा मोटर्स या वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीने आपल्या प्रवासी वाहनाच्या किमतीमध्ये वाढ जाहीर केली आहे.
कंपनीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की ही दरवाढ साधारणपणे 0.9 टक्के इतकी असणार आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी 19 जानेवारीपासून केली जाणार आहे. काही उत्पादनाच्या दरात वाढ केली असली तरी काही उत्पादनाच्या दरात दहा टक्क्यांपर्यंत कपातही करण्यात आली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
मात्र ज्या ग्राहकांनी 18 जानेवारीच्या अगोदर वाहनांचे बुकिंग केले आहे. त्यांना या दरवाढीतून वगळण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. गेल्या आठवड्यात मारुती-सुझुकी या कंपनीने आपल्या विविध वाहनाच्या दरात 4.3 टक्क्यापर्यंत वाढ केली होती. पोलाद, ऍल्युमिनियम, तांबे, प्लास्टिक आणि इतर धातूंच्या दरात वाढ झाल्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.