बंगळुरु – प्रो-कबड्डी लीगमध्ये ( Pro Kabaddi League ) सोमवारी झालेल्या अत्यंत अतीतटीच्या लढतीत तमिळ थलैवाज संघाने पाटणा पायरट्सवर 33-32 अशी अवघ्या एका गुणाने मात केली. या विजयाच्या जोरावर तमिळ संघाने स्पर्धेतील बाद फेरीत स्थान मिळवण्याचा दावा आणखी भक्कम केला.
या सामन्याला प्रारंभ झाल्यापासून तमिळ संघाने आघाडी घेतली होती. पहिले सत्र संपले तेव्हा दोन्ही संघात सातत्याने चुरस रंगत होती. मात्र, दुसऱ्या सत्रात तमिळ संघाने आपला अनुभव पणाला लावला व पाटणा संघाचा पराभव केला. तमिळ संघाच्या हिमांशु व नरेंद्र होशियारने चांगल्या पकडी केल्या. पाटणाकडून रोहित गुलियाने जिद्दी खेळाचे दर्शन घडवले मात्र, त्याचे हे प्रयत्न संघाच्या विजयासाठी पुरेसे ठरले नाहीत.
यापूर्वी झालेल्या लढतीत यु पी योद्धा संघाने बंगळुरु बुल्स संघाचा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रापासून यु पी योद्धाने वर्चस्व राखताना बंगळुरु संघावर 44-37 अशी मात केली. यु पी योद्धाकडून स्टार खेळाडू प्रदीप नरवाल व सुरींदर गिल यांनी प्रत्येकी 14 गुण मिळवताना सामन्यावर पकड ठेवली. विकास खांडोला व भरत या बंगळुरुच्या खेळाडूंनीही चांगली लढत दिली मात्र, ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.