दहशतवादावर सौम्य भूमिका घेऊन विरोधक जनतेचे प्राण धोक्‍यात आणत आहेत – मोदींचे टीकास्त्र

पाकिस्तानचे हिरो बनण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा

सहारनपूर -विरोधक दहशतवादाविषयी सौम्य भूमिका घेत आहेत. त्यातून ते जनतेचे प्राण आणि भविष्य धोक्‍यात आणत आहेत, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोडले.

भाजपच्या प्रचारासाठी उत्तरप्रदेशच्या सहारनपूर आणि अमरोहामध्ये झालेल्या सभांमध्ये मोदी बोलत होते. त्या सभांमध्ये त्यांनी दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावरून विरोधकांना लक्ष्य केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून कारवाई केली. त्याचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले, दहशतवादी हल्ल्यानंतर मी शांत बसायला हवे होते की प्रतिहल्ला करायला हवा होता? दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, ती बाब काही लोकांना रूचलेली नाही. त्यातून भारताच्या प्रत्युत्तरामुळे त्यांची झोप उडाली.

जगासमोर पाकिस्तानचा पर्दाफाश झाल्यावर ते लोक त्या देशाला अनुकूल ठरेल असे बोलू लागले. त्या देशाचे हिरो बनण्याची स्पर्धाच त्यांच्यात सुरू झाली. अर्थात, केंद्रात चौकीदार असल्याने मागील पाच वर्षांत निष्पाप जनतेवरील दहशतवादी हल्ले थांबले, असा दावाही त्यांनी केला. मोदी हटाव असा केवळ एकच अजेंडा विरोधकांपुढे आहे. घराणेशाहीच्या राजकारणाला प्रोत्साहन देणे एवढाच त्यांचा उद्देश आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर आणखी शाब्दिक प्रहार केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.