हडपसर – रविवारी (दि ११) संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर आज आमदार चेतन तुपे यांच्यासह महापालिका व अग्निशमन विभागांच्या अधिकार्यांनी हडपसर मधील सखल भागात तसेच सोसायटीच्या व बैठी घराच्या भागात साचलेले पाणी यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. चेंबर आणि पावसाळी गटार तुंबून ओढवलेल्या या स्थितीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित अधिकार्यांना आमदार तुपे यांनी केल्या.
हडपसर परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने ब-याच सोसाट्यांच्या पार्किंग आवारात जलतरण तलावाची स्थिती निर्माण झाली. ज्यांची घरे सखल भागात आहेत. अशा घरांना पाण्याचा वेढाच निर्माण झाला होता.अनेक ठिकाणी भींत पडली असून, चेंबर तुंबल्याने पाणी वाहून पुढे गेले नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याचे यावेळी आमदार चेतन तुपे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त संदीप कदम, सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, उप अभियंता विक्रम लहाने, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, विजय देशमुख, ईशान तुपे,विक्रम जाधव, शंतनू जगदाळे, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.
“रविवारी सायंकाळी आलेला पाऊस हा अतिशय मोठा होता.तेवढ्याच प्रमाणात सगळीकडे पाणी वाहिले सोसायटी आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरले .कालच महापालिका आयुक्तांना हडपसर, मांजरी रामटेकडी, कोंढवा व कात्रज परिसरात पावसामुळे झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे, आयुक्तांनी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पाणी साचलेल्या सोसायटीत पंप द्वारे पाणी काढण्याच्या काम सुरु केले आहे. भविष्यात अशी स्थिती निर्माण होवू नये यासाठी मोठ्या क्षमतेच्या पावसाळी व ड्रेनेज लाईन टाकणे, कालवा खोलीकरण करणे अशी कामे करावी लागणार आहेत. तसेच साचलेले पाणी तातडीने उपसण्यासाठी काही पंप महापालिकेने उपलब्ध करावेत.” – चेतन तुपे (आमदार, हडपसर)