मुंबई – झी मराठीवर सुरु असणारा नवीन कुकरी शो म्हणजेच, ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच गाजत आहे. अतिशय कमी कालावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतंच ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील काही तरुण-तडफदार नेतेमंडळी दिसून येत आहेत.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे, कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी, आमदार प्रणिती शिंदे यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी हे तिघेही कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संकर्षणसोबत मजामस्ती करताना दिसून आले.
यातच या वेळी ही नेते मंडळी एकमेकांना टोले लावतांना दिसून येत आहे. कार्यक्रमादरम्यान, पंकजा मुंडे यांना चिकनचा रस्सा बनविण्याचा टास्क दिला होता. पण चिकन बनविण्यासाठी लागणारं सामान घेताना पंकजा मुंडे नेमकं खोबरं आणण्याचं विसरल्या. त्यामुळे कार्यक्रमाच्या फॉर्मटनुसार पंकजा यांना शिक्षा मिळाली. तेव्हा त्यांनी मला नेहमीचं ‘मी न केलेल्याची शिक्षा मिळते,’ असा टोमणा लगावला. नेमकं त्यांनी हा टोला कोणाला लगावला हे मात्र समजलं नाही.
यावेळी तेथे उपस्थित रोहित पवार म्हणाले, ‘ताई सगळ्यांनाचं खाऊ घालतात, काँग्रेस झालं, राष्ट्रवादीलाही कधीतरी आमंत्रण द्या, असा चिमटा त्यांनी काढला. त्यावर पंकजा मुंडेनी ‘मी तुम्हाला आमत्रंण द्यायला तयार आहे. तुम्हाला जे आवडतं. ते खायला घालायची कला माझ्याकडे आहे,’ असा प्रतिटोला लगावला आहे.रोहित पवार यांनीही यावेळी चागंल्याच कोपरखळ्या मारल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणाला मुंडे आणि पवार घराण्याचा मोठा वारसा आहे.. तसेच या दोन्ही घराण्यात सत्ता संघर्ष ही काही लपून राहिलेला नाही.. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून सुरू असलेला राजकीय संघर्ष आज देखील दिसून येतो.. या दोन्ही घराण्यातील राजकीय संघर्ष टोकदार असतानाच आता मात्र एक वेगळाच प्रकार घडला आहे.