सिम्बायोसिस गुण अनधिकृतरित्या वाढविलेले प्रकरण

एकाला पोलीस कोठडी, तर एकाला जामीन

पुणे – बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन सिंबायोसिस मधील 178 विद्यार्थ्यांचे गुण अनधिकृरित्या वाढविल्याच्या प्रकरणात सुमित मुरारीलाल अग्रवाल (वय 25, रा.राजस्थान) याला न्यायालयाने 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, मुल्यमापन प्रमुख संदीप हेंगळे याला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजुर करण्यात आला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी हा आदेश दिला.

हेंगळे याच्या वतीने ऍड. पुष्कर दुर्गे यांनी बाजू मांडली. सात दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पैशासह कशाचीही जप्ती झालेली नाही. कमिटीमधील इतर कोणांकडे तपास झाल्याचे निष्पन्न झालेले नाही. पूर्वी कामाला असलेल्या प्रदीपकुमार याच्या नावाचाही एफआयारमध्ये उल्लेख आहे. मात्र, त्याच्याकडे तपास झालेला नाही. त्याला फसवणूक आणि सायबरचे कलम लागू होत नसल्याचा युक्तीवाद ऍड. पुष्कर दुर्गे यांनी केला. त्यानुसार हेंगळे याला दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या इतर अटींवर जामीन मंजुर झाला आहे.

हेंगळेला जामीन देण्यासाठी तपास अधिकाऱ्यांकडून म्हणणे मागविले होते. मात्र तपास अधिकाऱ्यांकडून म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्याशिवाय हा आदेश देण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणात सुमित अग्रवाल याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी या प्रकरणात सिम्बायोसिसमधील आणखी कोणाचा सहभाग आहे का, आणि इतर कारणासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.