मुंबई – रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाचा एकाच सामन्यातून स्टार बनलेला देवदत्त पडीक्कल नावारूपाला आल्यावर त्याच्या संघातील समावेशावरून सुरू झालेले प्रश्न थंडावले. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतकी खेळी केल्याने सोकॉल्ड जाणकारांची तोंडे बंद झाली. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये सरस कामगिरी केल्याने तो सर्वप्रथम चर्चेत आला असला तरीही त्याची गुणवत्ता त्यापूर्वीच जोखली गेली होती.
बीसीसीआयने जवळपास दोन दशकांपूर्वी सुरू केलेल्या गुणवत्ता शोधमोहिमेतूनच (टॅलेंट हंट) पडीक्कल हा गुणवान खेळाडू गवसला आहे. मूळचा केरळचा असूनही तो कर्नाटकमध्ये स्थायिक झाला व त्यानंतर त्याची कारकीर्द सुरू झाली.
देशातील युवा खेळाडूंमधून गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी ही योजना बीसीसीआयने सुरू केली व त्यासाठी भारतीय संघाच्या माजी खेळाडूंना सेकंड बेंच समोर आणण्यासाठी नियुक्त केले गेले. आता या मोहिमेचे स्वरूप आणखी विस्तारले असून देशातील स्थानिक स्पर्धांमधील सामनेही सातत्याने पाहिले जातात व त्यातील कामगिरीचा निकष ठरवून काही खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले जाते.
पदार्पणातच अविस्मरणीय कामगिरी…
पडीक्कलने आयपीएल स्पर्धेतील पदार्पणाच्या लढतीत अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने विविध स्पर्धांमध्ये पदार्पणातच अर्धशतकी खेळी करण्याची अविस्मरणीय कामगिरी नोंदवली आहे. त्याने प्रथम श्रेणी, लिस्ट ए तसेच टी-20 पदार्पणाच्या सामन्यात अर्थशतक झळकावले आहे.