रोम – सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच याने अखेर यंदाच्या मोसमातील स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात यश प्राप्त केले. त्याने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिएगो स्वात्झर्मन याचा 7-5, 6-3 असा पराभव केला व विजेतेपद पटकावले.
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला लाइनमनला चेंडू मारल्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले होते. याही स्पर्धेत उपांत्य लढतीतही त्याने एका निकालावरून पंचांशी हुज्जत घातल्याने त्याच्यावर टीका सुरू झाली होती. मात्र, त्याने या कृत्याबाबत दिलगिरी व्यक्त केली व हा वाद संपुष्टात आणला.
यानंतर मात्र, त्याने अंतिम सामन्यात आपल्या गुणवत्तेची साक्ष देताना सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. या विजेतेपदामुळे आता तो या महिनाअखेरीस सुरू होत असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी सज्ज बनला आहे.