पुणे – गेल्या दीड वर्षापासून करोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या पुणे शहरावर म्यूकरमायकोसिसनंतर झिकाचे सावट असताना पुन्हा स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.
बिनवडे यांच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच त्यांनाही करोना सदृश लक्षणे असल्याने त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात, बिनवडे यांना स्वाईन फ्लू झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने माहितीस दुजोरा दिला आहे. त्यातच, शहरात व्हायरलसह चिकनगुन्या आणि डेंग्यूचे रुग्णही वाढत असल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. तर, महापालिका हद्दित नव्याने समाविष्ट झालेले सूस गाव झिकाबाबत अती संवेदनशिल म्हणून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. तर, गेल्या काही दिवसांपासून खासगी हॉस्पिटलमधूनही स्वाईन फ्लूच्या रुग्णाच्या घशातील नमुने एनआयव्हीला तपासणीसाठी पाठवायचे असल्याने महापालिका प्रशासनाकडे विचारणा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
12 वर्षांपूर्वी आढळला होता पहिला रुग्ण
शहरात 2009 मध्ये स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास 1 वर्षे या साथीने शहरात कहर माजवला होता. मात्र, स्वाईन फ्लूवर उपचारासाठी “टॅमीफ्लू’ हे औषध उपलब्ध असले तरी सुमारे 1 हजार पुणेकरांचा बळी गेला होता. हजारो पुणेकरांना या आजाराची लागण झाली होती. दरम्यान, याच कालावधीत शहरात आठ दिवस सार्वजनिक वाहतूक, शाळा तसेच गर्दीची ठिकाणे अंशत: बंद करत लॉकडाऊन सदृश स्थिती होती. तर, त्यावेळी साथरोग नियंत्रण कायदा 1897 लागू केला होता. पुढे दोन ते तीन वर्षे या साथीचे रुग्ण शहरात लक्षणीय प्रमाणात सापडत होते. मात्र, त्यानंतर दरवर्षी काही प्रमाणात या साथीचे रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या काही काही दिवसांपासून शहरात पुन्हा या साथीचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थ्यांनाच सर्वाधिक बाधा
शहरात स्वाईन फ्लूच्या साथीच्या वेळी सुरुवातीच्या टप्प्यात सर्वाधिक बाधा शालेय मुलांना झाली होती. अमेरिकेहून परत आलेल्या एका मुलाच्या मावसभावाला या आजाराची लागण झाल्यानंतर संबंधित मुलाच्या शाळेतील अनेक मुले बाधित झाली. त्यानंतर शहरातील अनेक शाळकरी मुलांमध्ये हा आजार पसरला होता. मात्र, त्यावर उपचार असल्याने तसेच वेळीच निदान झाल्यास रुग्णांचा जीव वाचविण्यात तसेच साथ नियंत्रणात आणण्यात आरोग्य विभागास यश आले होते. मात्र, आता करोनाची साथ कमी झाल्याने पुन्हा ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात शाळा सुरू होतानाच शहरात चिकनगुन्या, व्हायरल, डेंग्यू आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.