नवी दिल्ली – भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्टला निधन झाले होते. मात्र, त्यांची शेवटची इच्छा मुलगी बासुरीने पूर्ण केली आहे. मृत्यूच्या काही वेळआधी त्यांनी पाकिस्तानमध्ये तुरुंगात बंद असलेले कुलभूषण जाधव यांची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांना फी घेण्यासाठी भेटायला बोलावले होते. मात्र ते शक्य झाले नाही. दरम्यान, शुक्रवारी सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज यांनी हरीश साळवे यांना १ रुपयाची फी दिली आहे.
@sushmaswaraj बांसुरी ने आज तुम्हारी अंतिम इच्छा को पूरा कर दिया है. कुलभूषण जाधव के केस की फ़ीस का एक रुपैया जो आप छोड़ गयीं थी उसने आज श्री हरीश साल्वे जी को भेंट कर दिया है. pic.twitter.com/3P8gaB6kkx
— Governor Swaraj (@governorswaraj) 27. syyskuuta 2019
या संदर्भात सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी ट्विट केले आहे. ‘आज तुमची शेवटची इच्छा पूर्ण झाली आहे. कुलभूषण जाधव यांच्या खटल्याचे शुल्क आज बांसुरीने हरीश साळवे यांना दिले आहे, असे स्वराज यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
नेदरलँड्सच्या हेगमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची बाजू मांडली होती. यानंतर आयसीजेने जाधव यांच्या फाशीवर बंदी आणली आणि पाकिस्तानला या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले. या खटल्याच्या सुनावणीत साळवे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 1 रुपयाची फी घेतली. पण, सुषमा स्वराज यांच्या अचानक निधनामुळे त्यांना फी देणे बाकी होते. आज सुषमा यांच्या मुलगी बांसुरीने साळवे यांना फी दिली.