मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाला अंमली पदार्थ रॅकेटची किनार असल्याचं स्पष्ट झालंय. बॉलिवूडमधील या ड्रग्ज रॅकेटची आता अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
अशातच आज एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने गरज भासल्यास अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
एनसीबीमधील सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या हाती काही व्हॉट्सऍप चॅट लागले असून यामध्ये ड्रग्जबाबतची चर्चा सुरु असल्याचा संशय आहे.
हाती लागलेल्या या व्हॉट्सऍप चॅट्सपैकी काही चॅट्स हे दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिष्मा प्रकाश व ‘डी’ नामक व्यक्तीदरम्यानची आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.
अधिकाऱ्याने एनसीबीतर्फे अभिनेत्री राकुल प्रीत सिंग, सारा अली खान व डिझायनर सिमोन खंबाट्टा यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकत अशी शक्यता वर्तवली.
यापूर्वी, एनसीबीने ड्रग्ज रॅकेटप्रकरणी दीपिकाची मॅनेजर करिष्मा प्रकाश व क्वान टॅलेंट मॅनेजमेंटचे प्रमुख धुर्व चिटगोपेकर यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.
याबाबत बोलताना एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “एनसीबी करिष्मा प्रकाशची चौकशी करेल यानंतर गरज वाटल्यास दीपिकाला देखील चौकशीसाठी बोलवलं जाईल.”
दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणाला अंमली पदार्थ रॅकेटची किनार असल्याचे लक्षात आल्याने याचा स्वतंत्र तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात येत आहे. तपासादरम्यान बॉलिवूडमधील मोठ्या ड्रग रॅकेटबाबतची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे.