राजकारणात मूल्य,सिद्धांताची जपणूक करणाऱ्या भाजपाला साथ द्या- योगी आदित्यनाथ

लोणावळा – राजकारणात परमार्थ, मूल्य, विचार व सिद्धांताची जपणूक करणाऱ्या भाजपाला साथ द्या, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासियांना केले. मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचाराकरिता लोणावळा शहरात आयोजित सभेत योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना मार्गदर्शन करताना स्वार्थी राजकारणावर टीका केली.

या वेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, लोणावळा शहराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेना शहराध्यक्ष सुनील इंगूळकर, रिपाईच्या महिलाध्यक्षा यमुना साळवे, बिंद्रा गणात्रा, शौकत शेख, भरत हारपुडे, मोतीराम मराठे, देविदास कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना योगी अदित्यनाथ म्हणाले की, राजकारण हे स्वार्थाचे नसावे ते परमार्थ, आदर्श, मूल्यावर आधारित असावे. सत्ता राष्ट्राला समर्पित असल्यास विकास कसा होतो, हे मागील पाच वर्षात देशाने पाहिले आहे. मागील 70 वर्षे देशाचे विभाजन करणारे कॉंग्रेस पक्षाने लादलेले कलम 370 मोदी सरकारने रद्द करत देशाला एक भारत श्रेष्ठ भारत बनविले. महिला सशक्तीकरणाकरिता तिहेरी तलाक विरुद्ध कायदा करीत मुस्लिम महिलांना सन्मान मिळवून दिला. अन्नदाता शेतकरी सन्मानाकरिता किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्जवला गॅस योजना, स्वच्छतागृह दिले, घरकुल योजना, युवकांना रोजगार दिला, शहिदांच्या कुटूबियांना मोठा आर्थिक आधार दिला, देशाचा व महाराष्ट्राचा विकास करण्याकरिता मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा विकास केला.

नवीन कारखानदारी आणली. शेवटी जो विकास करणार त्याला जनता साथ देणार हा सिद्धांत आहे. बाळा भेगडे यांनी 1400 कोटी रुपयांचा निधी आणत मावळात विकास केला. त्यांची योग्यता व क्षमता पाहून त्यांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे. भेगडे यांनी मावळ तालुक्‍याला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेला आहे. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मनोगतात मावळात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवत काय विकास केला म्हणणाऱ्यांनी समोर येऊन बसावे, असे आवाहन विरोधकांना केले. मावळ तालुक्‍यात मोठ्या संख्येने नागरिक योगी आदित्यनाथ यांच्या सभेला यावेळी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.