पुणे -प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पुणे येथून भुवनेश्वरसाठी 14 जानेवारीपासून सुपरफास्ट गाडी सोडण्यात येणार आहे. यासह शिर्डी ते विशाखापट्टणम ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
रेल्वेकडून जूनपासून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे-भुवनेश्वर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी 14 जानेवारीपासून दर गुरुवारी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर येथे पोहोचणार आहे. तर, भुवनेश्वर येथून साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी 12 जानेवारीपासून दर मंगळवारी सुटणार असून, तिसऱ्या दिवशी पुणे स्टेशन येथे पोहोचणार आहे. ही गाडी सोलापूर, कलबुर्गी, वाडी, सिकंदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, ब्रह्मपूर आदी स्थानकांवर थांबणार आहे. यासह पनवेल-हजूर साहिब नांदेड ही गाडी 21 जानेवारी ते 1 एप्रिलपर्यंत, हजूर साहिब नांदेड-पनवेल गाडी 19 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत धावणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.