शाळांना येत्या 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबरोबरच नवीन शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून सुरू होणार असल्याचे शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे उन्हाळी सुट्टीच्या वादावर पडदा पडला आले.
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते नववी, अकरावीच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबतही परिपत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन 2022 ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासनस्तरावरुन निर्णय घेण्यात आलेला आहे.
दि. 2 मे ते 12 जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात शाळा 13 जूनपासून सुरू होणार आहेत. जूनमध्ये विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर येथील शाळा 27 जूनपासून सुरू होतील, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
निकाल 30 एप्रिलला
इयत्ता पहिली ते नववी, अकरावीच्या परीक्षांचा निकाल 30 एप्रिल रोजी अथवा त्यानंतरच्या सुट्टीत लावता येणार आहे. निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही संबंधित शाळेचीच असणार आहे.