भाजपने बदलला बंगाल प्रदेशाध्यक्ष; दिलीप घोष यांच्या जागी सुकांत मजुमदार

नवी दिल्ली – भाजपने सोमवारी पश्‍चिम बंगाल शाखेत नेतृत्वबदल केला. त्यानुसार, दिलीप घोष यांना हटवून खासदार सुकांत मजुमदार यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले.
बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने बाजी मारल्याने बंगालची सत्ता मिळवण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. त्यानंतर भाजपला गळती लागली आहे.

काही आमदारांनी पक्षबदल करत स्वगृही (तृणमूल) परतण्याला पसंती दिली. एवढेच नव्हे तर, माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी भाजपला रामराम ठोकत तृणमूलमध्ये प्रवेश केला. गळतीसत्रामुळे भाजपमधील अस्वस्थता वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्याशिवाय, निवडणुकीतील पीछेहाटीनंतर घोष यांच्यावर पक्षातूनच टीका होऊ लागली. त्यापार्श्‍वभूमीवर, भाजपने प्रदेशाध्यक्ष बदलाचे पाऊल उचलले.

खासदार असणाऱ्या घोष यांना आता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे. दरम्यान, बेबीराणी मौर्य यांचीही भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उत्तरप्रदेशातील दलित नेत्या असणाऱ्या मौर्य यांनी नुकताच उत्तराखंडच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. पुढील वर्षी उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत मौर्य यांच्यावर भाजपकडून महत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.