सांगली – दोन तरूणी आणि एका तरूणाचा मृतदेह तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील शेकोबा डोंगरावर आढळून आले आहेत. मृतदेहाशेजारी विषारी औषध, दोन पुष्पगुच्छ, तीन ग्लास, हार, चाॅकलेट आढळून आल्याने प्रेमाच्या त्रिकोणातून तिघांनी आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हरीश हणमंत जमदाडे (वय 21 रा, मणेराजुरी), प्रणाली पाटील आणि शिवानी घाडगे अशी मयत तरुण आणि तरुणींची नावे आहेत.
परिसरातील स्थानिक नागरिकांना डोंगरावर मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. तिघांनीही द्राक्ष बागेवर फवारण्यासाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या तीनही जणांच्या मृतदेहाजवळ दोन पुष्पगुच्छ, तीन ग्लास, हार,चाॅकलेट्स आणि विषारी कीटकनाशकाची बाटली सापडली आहे. या तिघांची आत्महत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.