उसाची पळवापळवी होण्याची शक्‍यता

संग्रहित छायाचित्र

पुणे – राज्यात गळीत हंगाम सुरू होऊन महिना होत आला, तरी अद्याप फक्त पन्नास साखर कारखान्यांनी प्रत्यक्षात ऊस गाळप सुरू केले आहे. ही स्थिती अशीच राहिली तर आगामी काळात कारखान्यांना उसाची तीव्र टंचाई जाणवणार असून त्यातून ऊस पळवापळवी होण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे.

राज्यात गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे आधीच उसाचे उत्पादन यंदा घटणार होते. त्यातच पश्‍चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीचा फटका सुद्धा उसाला बसल्यामुळे त्यात आणखी घट झाली आहे. त्यामुळेच दर वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारा गळीत हंगाम यंदा तब्बल महिनाभर उशिरा म्हणजे दिवाळीनंतर सुरू झाला आहे. अद्यापही हंगामाने जोर पकडलेला नाही.

राज्यातील 130 कारखान्यांनी गाळपासाठी परवाने नेले आहेत त्यापैकी फक्त पन्नास कारखाने सुरू झाले आहेत म्हणजे तब्बल 80 कारखान्यांनी गाळप सुरू केलेले नाही. उसाची उपलब्धता कमी असल्याचे कारण दिले जाते. साखर कारखान्याचा बॉयलर एकदा पेटला की साधारणत: 120 दिवस तरी तो सुरू राहिला पाहिजे म्हणजे कारखान्यांचे आर्थिक गणित बसते; पण सध्या उसाची कमतरता लक्षात घेता जे सुरू झालेले कारखाने आहेत ते सुद्धा 120 दिवस सुरू राहतील की नाही याची शक्‍यता नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

राज्यात यंदा उसाचे क्षेत्र हे निम्याहून कमी झाले आहे. त्यामुळे हा परिणाम होत आहे. उलट आणखी काही दिवसांनी ज्या शेतकऱ्यांकडे ऊस आहे त्याला जास्त भाव येणार आहे. त्यातून आगामी काळात उस पळवापळवी सुद्धा होऊ शकते. ज्यांच्याकडे ऊस आहे. त्या शेतकऱ्याला भाव सुद्धा चांगला मिळणार आहे.
– शेखर गायकवाड, साखर आयुक्त

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)