कराड – येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करावे. यासाठी जिल्हाधिकारी यांना कराड नगरपालिकेच्या नगरसेवकांनी निवेदन दिले आहे. दरम्यान, निवेदनात 30 एप्रिल 2020 च्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. सदर रुग्णालय नॉन कोविड म्हणून घोषित करून त्याची कोविड रुग्णालय म्हणून असलेली मान्यता रद्द करावी. अन्यथा, दि. 11 मे पासून कराडकरांना करोनाग्रस्त परिस्थिती असूनही रस्त्यावर उतरून जनअंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची जनशक्ती विकास आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, नियोजन समितीचे सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान, नगरसेवक गजेंद्र कांबळे, निशांत ढेकळे यांनी भेट देऊन निवेदन दिले.
सध्या संपूर्ण देश करोनाशी निकराने झुंज देत आहे. या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांना दाखल करायच्या हॉस्पिटलसाठी शासनाने काही निकष निर्देशित केले आहेत. या निकषाचे पालन कोविड रुग्णालयांनी कसोशिने करण्याची आवश्यकता आहे. सुरुवातीस करोनाने बाधित झालेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज येथे ना. जयंत पाटील यांच्या मागदर्शनाखाली अशा रुग्णालयाची निर्मिती तातडीने केली गेली. यासाठी मुंबईहून तज्ज्ञ डॉक्टरांची समितीही आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे करोना ग्रस्तांवर उपचार झाले.
सातारा जिल्ह्यातील कराड येथे मात्र, यापैकी कोणतेही निकष न पाळणाऱ्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली. दि. 20 एप्रिल 2020 पासून येथे रुग्ण दाखल व्हायला सुरुवात झाली. याठिकाणी करोना तपासणीसाठी स्वॅबचे नमुने घेतले जाऊ लागले. सदर रुग्णालयातील मुलभूत वैद्यकीय सुविधांची अवस्था शोचनीय आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. येथे एकूण 9 डॉक्टर कार्यरत आहेत. यातील 3 डॉक्टर घश्यातील स्त्रावाच्या तपासणीसाठी नमुने घेण्याचे काम करतात. 3 डॉक्टर राखीव असून अन्य 3 डॉक्टर इतर तपासणीची कामे करतात.
स्वच्छतेचे कोणतेही निकष या ठिकाणी पाळले जात नाहीत. सदर रुग्णालयात गर्भवती रुग्णांसाठी असणारा वॉर्ड करोना कक्षाला लागून असून यासाठी वेगळे प्रवेशद्वार नाही. सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याने कोणीही रुग्णालयात येवून या वॉर्डमध्ये सुद्धा जाऊ शकते. दि. 30 एप्रिल रोजी एका गर्भवती करोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात येऊन नर्स, वॉर्डबॉय व इतर असे एकूण 6 रुग्णालयातील कर्मचारी करोनाने बाधित झाले. त्यांचे नमुने पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. यात इतर 2 रूग्णांचाही समावेश आहे. यावर राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी येथील कोणत्याही बाबीची दखल न घेता बाधित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देऊ, असे सांगितले.
सदर रुग्णालयात डॉ. प्रकाश शिंदे हे कार्यरत आहेत. रुग्णालयात कोणत्याही सुविधा नसताना वरिष्ठांची दिशाभूल करून त्यांनी सदर रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून मान्यता मिळवली आहे. एवढे सगळे घडूनही त्यांनी 28 एप्रिल व 5 मे रोजी रुग्णालयामध्ये लसीकरणाची मोहीम राबवली सध्या कृष्णा हॉस्पिटल येथे करोना ग्रस्तांवर चांगले व यशस्वी उपचार होत आहेत. तसेच इतर खासगी हॉस्पिटल सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. तेथे सदरच्या कोविड रुग्णालयाचे स्थलांतर करणे सहज शक्य आहे.
वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय हे कराड शहराच्या मध्यवस्तीत असून शासनाचे निकष पूर्ण केले नसताना सुद्धा त्याला कोविड रुग्णालय म्हणून मिळालेली मान्यता तातडीने रद्द करावी. डॉ. शिंदे यांच्या गैरकारभाराची चौकशी करावी, सदर रुग्णालय नॉन कोविड म्हणून घोषित करावे. अन्यथा, ररत्यावर उतरून जनअंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
डॉ. शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे धोका
डॉ. प्रकाश शिंदे हे प्रत्यक्ष कामकाजामध्ये कोणताही सहभाग घेत नाहीत. दुय्यम कर्मचाऱ्यांकडून ते रुग्णालयातील कामे करून घेतात. ते पाच कि.मी. दूर असलेल्या खासगी बंगल्यातून रुग्णालयाचे काम करतात. कोविडग्रस्त रुग्णांची वेळेवर तपासणी न करणे, त्यांना वेळेवर जेवण न देणे, त्यांना संसर्ग विरहित न ठेवणे आदी गोष्टींवर त्यांचे कोणतेही लक्ष नसल्याने रुग्णांमध्ये घबराट निर्माण झाली असून याच कारणामुळे त्यांचे मनोधैर्य खचत आहे. चरेगाव येथून रुग्णालयात दाखल झालेल्या करोनाग्रस्त रुग्णाला याच कारणामुळे कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करावे लागले. डॉ. शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला धोका निर्माण झाला असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.