मुंबई – स्थूल अर्थव्यवस्थेसंदर्भात सकारात्मक आकडेवारी जाहीर होत आहे. त्याचबरोबर करोनाविषयक निर्बंध कमी होत आहेत. या कारणामुळे गुंतवणूकदार कमालीचे आशावादी झाले असून या आठवड्यात गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर विराजमान झाले.
बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 546 अंकांनी वाढून 54,369 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स प्रथमच 54 हजार अंकांच्या पुढे गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 128 अंकांनी उसळून 16,246 अंकांवर बंद झाला.
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आल्यामुळे निर्देशांकांना चांगलाच आधार मिळाला. एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक,ऍक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक या बॅंकींग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदली गेली. अशा परिस्थितीतही टायटन, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने बुधवारी आपला ताळेबंद जाहीर केला.
या ताळेबंदातील नफा अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बुधवारी सर्वच बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे रिलायन्स सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले.
भारतातील परिस्थिती सकारात्मक असतानाच अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातून सकारात्मक संदेश आल्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्यामुळे रुपयालाही आधार मिळाला. रुपयाचा भाव आज 9 पैशांनी वाढून 74.19 रुपये प्रति डॉलर झाला.
निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केली. त्यामुळे सेन्सेक्स संबंधातील 30 पैकी केवळ 14 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर 16 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी जुलै महिन्यात 11 हजार कोटी रुपये काढून घेतले तर याच काळात देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 21 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामध्ये म्युच्युअल फंडाचा वाटा 13,900 कोटी आहे.