लोणावळा, (वार्ताहर) – वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर धडक कारवाई करीत जुगार अड्डा चालविणाऱ्या व जुगार खेळणाऱ्या १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, मटक्याचे साहित्य, ऑटो रिक्षा असा एकूण एक लाख दहा हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई लोणावळा उपविभागाचे सहाय्यकपोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने केली. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगाव येथे अवैधरित्या मटका अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली होती.
त्याच्या अधारे सोमवारी (दि. २६) गुन्हे अन्वेषण पथकाने मौजे वेहेरगाव येथील संतोष बोत्रे यांच्या मालकीच्या पडीक मोकळ्या जागेवर एका झाडाखाली पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये मटका अड्डा चालविणारा एजंट सिध्दार्थ खरात (वय ४१) व मटका खेळणारे जगन्नाथ मावकर (वय ४८),
सुनील सूर्यवंशी (वय ४७), गोरख मोहिते (वय ६०), विनायक उर्फ विजय देवकर (वय ५५) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मटक्याचे साहित्य, ऑटो रिक्षा असा एकूण एक लाख दहा हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चंद्रकांत हौजी देवकर, शंकर नाना बोरकर, निलेश सहादु बोरकर, संतोष नामदेव बोत्रे (सर्व रा. वेहेरगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे) हे सदरचा मटका अड्डा चालवत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक तसेच सचिन राऊळ, शुभम चव्हाण, नितेश कवडे, सागर बनसोडे, अंकुश नायकुडे, सुभाष शिंदे, गणेश येळवंडे याच्या पथकाने केली.
….