बुलढाणा येथे कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणाचा निषेध
पुणे – बुलढाणा येथील दुय्यम निबंधकास मनसेच्या जिल्हाध्यक्षाने मारहाण केल्याच्या निषेधार्थ तसेच त्यास तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी पुण्यासह इतर सर्व जिल्ह्यांमधील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. त्यांनी अचानकपणे दस्त नोंदणी बंद केल्याने नागरिकांची माघारी जावे लागले. दिवाळीत घर, सदनिका आदी व्यवहारांची दस्त नोंदणी न झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला, तर शासनाचा महसूलही बुडाला.
दिवाळी सणाच्या मुहुर्तावर घर खरेदीचे नागरिकांचे प्राधान्य असते. मात्र, बुधवारी अचानकपणे नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केल्याने शहरात साडेबारा वाजल्यापासून दुय्यम निबंधक कार्यालयाने दस्त नोंदणी थांबवली. करोनानंतर आता अर्थचक्र रुळावर येत असताना, तसेच शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने नागरिक घर खरेदीस प्राधान्य देत आहेत. अशी परिस्थिती असताना दस्त नोंदणी बंद ठेवल्याने शासनाच्या तिजोरीलाही फटका बसला.
दस्त नोंदणीसाठी नागरिकांनी ऍपॉइन्टमेंट घेतली असती. त्यानुसार दिनांक आणि वेळ कळवण्यात येते. खरेदीदार आणि विक्री करणारे अशा दोघांनीही सुट्टी घेतलेली असते. अचानकपणे दस्त नोंदणी रद्द झाल्याने या सर्वांना परतावे लागले. आता त्यांना पुन्हा ऍपॉइन्टमेंट घ्यावी लागणार आहे.
दस्त नोंदणी घटली
राज्यात सुमारे 500 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. बुधवारी दुपारपासून दस्त नोंदणीचे काम बंद करण्यात आल्याने सकाळपर्यंत राज्यात खरेदी-विक्रीचे 7 हजार 962 इतकेच दस्त नोंदवण्यात आले.