लोणी देवकर, (वार्ताहर) – सध्या राज्यभरात सुरू असलेल्या कंत्राटी वीज कर्मचार्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनात इंदापूर तालुक्यातील कंत्राटी वीज कर्मचार्यांनी सहभाग नोंदविला.
यामध्ये त्यांनी प्रामुख्याने समान काम समान वेतन तसेच महानिर्मिती महापारेषण आणि महावितरणमध्ये समान काम समान वेतन लागू करावे, तसेच सर्व कंत्राटी कर्मचार्यांना विद्युत मंडळाच्या एनएमआर प्रमाणे सामावून घेण्यात यावे. तसेच वयाच्या 60व्या वर्षापर्यंत रोजगाराची शाश्वत हमी द्यावी आदींसह अन्य 17 मागण्या करीत कंत्राटी कर्मचार्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 42 हजार कंत्राटी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. यामध्ये इंदापूर उपविभागातील इंदापूर शहर, ग्रामीण, लोणी देवकर, बावडा, काटी आणि निमगाव केतकी या शाखेतील 74 कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कांबळे यांनी दिली.
मागील दहा ते पंधरा वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना वयाची अट शिथील करून निघालेल्या भरतीमध्ये सामावून घ्यावे तसेच पगारातील प्रकाश वेतन वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरूच राहणार आहे..