बंगळुरू : काँग्रेसमधील कलह काही केल्या संपत नाही. राजस्थान, पंजाबसारख्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादानंतर आता आणखी एका राज्यात संघर्ष उफाळून आला आहे. दक्षिणेतील कर्नाटकमध्ये पक्षाचे दोन नेते आमने-सामने आले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्यात वाद उफाळला आहे.
कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून सिद्धारामय्या आणि शिवकुमार यांच्या चढाओढ सुरू झाली आहे. शनिवारी सिद्धारामय्या यांनी भाजपामध्ये गेलेल्या आणि परत काँग्रेसमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. तर काही दिवसांपूर्वी शिवकुमार यांनी अशा नेत्यांच्या पक्षातील पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मी याबाबत प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्याशी बोलणार आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी आधीच विधानसभेत सांगितले होते की, काँग्रेस सोडणाऱ्या १४ नेत्यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही.
त्यापूर्वी डी.के. शिवकुमार म्हणाले की, फसवणे आणि राजकीय पक्ष बदलणे ही राजकारणातील सामान्य बाब आहे. केवळ डी.के.शिवकुमारच नाही तर काँग्रेस आणि प्रत्येक पक्षाकडे अशा घटनांची उदाहरणे आहेत.
प्रताप गौडा पाटील यांना आम्ही भाजपातून आणले होते. त्यामुळे कुठल्याही अन्य राजकीय पक्षामध्ये जाणे आणि राजकारणात परतणे ही सामान्य बाब आहे. काँग्रेस सदस्यत्व मिळवण्यासाठी येणाऱ्या कुठल्याही अर्जावर पक्ष विचार करेल आणि पक्षाचे हित लक्षात घेऊन विचार करेल.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धारामय्या यांवनी गुरुवारी आमदारांना सांगितले की, त्यांना २०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून सादर करू नका. या मुद्द्यावरून पक्षामध्ये अंतर्गत मतभेद वाढत आहेत. त्यावरून सिद्धारामय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्यात एकतर्फी खेळ सुरू आहे.