शिरूर -“माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत शिरूर शहरात बुधवार (दि. 16) ते गुरुवार (दि. 17) या काळात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दोन दिवसांत शहरातील सर्वच नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. संशयित नागरिकांची करोना रॅपिड टेस्ट करण्यात येणार असल्याचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल व शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. यासाठी आमदार अशोक पवार, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.
शहरातील दवाखाने, मेडिकल सुरू राहणार असून सकाळच्या वेळेस दूध विक्री सुरू राहणार आहेत. किराणा, भाजीपाला ही सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. शहरातील 300 विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या 145 टीम संपूर्ण शहरातील नागरिकांची ऑक्सिजन, तापाची तपासणी करणार आहेत. यातील संशयितांची लगेच करोना रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. मुंबई बाजार येथील शाळा, लाटेआळी येथील शाळा, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत या पाच ठिकाणी फ्लू क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. या क्लिनिकमधून नामांकित डॉक्टरांकडून तपासणी करून सर्दी, ताप, खोकला यावर औषध गोळ्या देण्यात येणार आहे.
सर्वे कामी 300 शिक्षक व नगरपालिका कर्मचारी काम करत आहेत. नगरपालिकेने केलेल्या आव्हानास आतापर्यंत शहरातील 97 युवकांनी करोना स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे. आणखी 300 स्वयंसेवक यांची आवश्यकता असल्याने नागरिकांनी, तरुण, तरुणी, महिला, स्वयंसेवी संघटना यांनी यात सहभागी व्हावे.
-प्रकाश धारिवाल, सभागृह नेते शिरूर नगरपरिषद