नगरसेविका सीमा सावळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी – कामानिमित्त रोज पुणे शहरातून पिंपरी चिंचवडला येणाऱ्या महापालिका सरकारी कर्मचाऱ्यांना थांबवा अशी मागणी महापालिकेतील भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे. या विषयावर त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
“करोना’चा प्रसार रोखण्यासाठी मुंबई शहरातून कामासाठी ठाणे- कल्याण- डोंबिवली येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिका आयुक्तांनी 8 मे पर्यंत बंदी घातली आहे. हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. याच पध्दतीने पुणे शहरातून रोज शेकडो कर्मचारी पिंपरी चिंचवड शहरात येत असतात. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका संभवतो.
पुणे शहरात करोनाचा प्रकोप झाला आहे. करोना रुग्णांची संख्या पाहता रोज पुणे ते पिंपरी चिंचवड असा प्रवास म्हणजे एक प्रकारे करोना प्रसारणाला प्रोत्साहन आहे. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठीचा संभाव्य धोका टाळावा, असे सावळे यांनी निवेदनात म्हटले आहे.